Ad will apear here
Next
मुंबई पर्यटन : मरीन ड्राइव्ह परिसर
क्वीन्स नेकलेस - मरीन ड्राइव्ह

‘करू या देशाटन’
सदराच्या गेल्या भागात आपण मुंबईचा पूर्व किनारा म्हणजेच बंदरे असलेल्या भागाची माहिती घेतली. आजच्या भागात माहिती घेऊ या मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील भागाची म्हणजेच मरीन ड्राइव्ह परिसराची....
.........
मुंबईतील मरीन ड्राइव्ह परिसरात सूर्यास्त आणि त्यानंतरचा पथदिव्यांचा झगमगाट समुद्रात प्रतिबिंबित होतो. ते चित्र म्हणजे जणू राणीच्या गळ्यातील रत्नहारच. म्हणूनच या परिसराला ‘क्वीन्स नेकलेस’ असेही म्हणतात. हा नजारा पाहण्यासाठी लोकांच्या गाड्या इकडे वळतात. १९२०च्या दशकात पश्चिमी युरोप आणि अमेरिकेत मूळ शैली म्हणून विकसित झालेल्या ‘आर्ट डेको शैली’तील इमारती हे या भागाचे वैशिष्ट्य. 

चर्चगेट स्टेशन

चर्चगेट स्टेशन :
हे मुंबई उपनगरी/ रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील (वेस्टर्न लाइन) दक्षिणेकडील टर्मिनस आहे. चर्चगेट स्टेशनपासून सेंट्रल रेल्वेमार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, मरीन ड्राइव्ह, हायकोर्ट, मंत्रालय, क्रॉफर्ड मार्केट ही ठिकाणे जवळ आहेत. ब्रिटिशांनी बांधलेल्या मुंबईतील मूळ किल्ल्याला असलेल्या तीन दारांपैकी (गेट) एक प्रवेशद्वार येथे होते. येथून निघणारा रस्ता प्रसिद्ध सेंट थॉमस चर्चकडे जात असे. म्हणून या गेटला चर्चगेट असे नाव पडले. १८६०मध्ये हे गेट पाडण्यात आले. १८७०मध्ये येथे रेल्वे स्टेशन बांधण्यात आले व त्याचे नाव चर्चगेट असे ठेवण्यात आले. १८७२मध्ये रेल्वे कुलाब्यापर्यंत वाढविण्यात आली. तथापि कुलाबा स्टेशन १९३०मध्ये बंद करण्यात आले व चर्चगेट हे दक्षिणेकडील सुरुवातीचे स्टेशन झाले. १८५५मध्ये मुंबई-बडोदा रेल्वेचे काम सुरू झाले. १८६७पर्यंत मुंबईपर्यंतचे काम पूर्ण झाले. ग्रँट रोडच्या पुढे मरीन लाइन्सजवळ ‘बॉम्बे बॅकबे’ नावाचे स्टेशन बांधण्यात आले. १२ एप्रिल १८६७ रोजी ‘बॉम्बे बॅकबे’पासून पहीली उपनगरीय रेल्वेसेवा सुरू झाली. 

चर्चगेट स्टेशन (१९३०)

सध्या पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय सेवा चर्चगेटपासून डहाणूपर्यंत आहे. विरारसाठी पहाटे सव्वाचार वाजता पहिली लोकल चर्चगेटहून सुटते. शेवटची लोकल मध्यरात्री एक वाजता बोरीवलीकडे जाते. दर १० मिनिटांनी येथून एक गाडी सुटते आणि येते. मध्य आणि पश्चिम रेल्वे दादर स्टेशनवर एकमेकांच्या जवळून धावतात. ठाण्याकडून चर्चगेटकडे जाणारे प्रवासी दादरला गाडी बदलतात. विरार-वसईकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे प्रवासीही दादरला उतरूनच गाडी बदलतात. २०१०पर्यंत १२ डब्यांच्या लोकल होत्या. त्या आता १५ डब्यांच्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन्स आणि बेस्टच्या बसेस रक्तवाहिनीप्रमाणे मुंबईकरांची अव्याहतपणे सेवा करीत आहेत. 



मरीन ड्राइव्ह :
मरीन ड्राइव्ह बघितल्याखेरीज मुंबईचे दर्शन झाल्यासारखे वाटत नाही. नरीमन पॉइंटपासून बाबुलनाथ आणि मलबार हिलला जोडणारा हा ३.६ किलोमीटरचा ‘सी’ आकाराचा आठपदरी रस्ता समुद्राच्या काठावरच आहे. या रस्त्याचे अधिकृत नाव नेताजी सुभाषचंद्र बोस रोड असे आहे. पूर्वेला रेल्वे, निरनिराळी जिमखाना मैदाने व आर्ट डेको शैलीतील इमारती आणि पश्चिमेला निळाशार समुद्र यामुळे याचे सौंदर्य खुलून दिसते. 

समुद्राच्या कडेने भव्य कठड्यासह संरक्षक भिंत आणि त्याला लागूनच मोठा प्रशस्त फुटपाथ आहे. संध्याकाळी मोकळी हवा व सूर्यास्त अनुभवण्यासाठी येथे लोकांची गर्दी होते. पावसाळ्यात उधाणाच्या वेळी रस्त्यावर पाणी फेकणाऱ्या समुद्राच्या लाटा बघणे ही एक मजाच असते. मरीन ड्राइव्हला ‘क्वीन्स नेकलेस’ म्हणूनही ओळखले जाते. कारण जेव्हा रात्री ड्राइव्हच्या बाजूने कोठेही पाहिले जाते तेव्हा स्ट्रीटलाइट गळ्यातील मोत्याच्या हारासारखे दिसतात. 



हा रस्ता वाळकेश्वर रस्त्यापासून दलदलीत भर टाकून भागोजीशेठ कीर आणि पालनजी मिस्त्री यांनी सिमेंट-काँक्रीटमध्ये बांधला. १९२० ते १९३०च्या दरम्यान श्रीमंत पारशी व्यापारी व उद्योजकांनी आर्ट डेको शैलीतील इमारती येथे बांधल्या. या आर्ट डेको इमारतींपैकी कपूर महल, झेव्हर महल आणि केवल महाल अशा अनेक सुंदर इमारती आहेत. ही बांधकामे १९३७ ते १९३९च्या दरम्यान झाली. (मरीन ड्राइव्ह परिसरातील आर्ट डेको शैलीतील इमारतींबद्दलचा सविस्तर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पंचतारांकित ओबेरॉय (ओबेरॉय हिल्टन टॉवर), दी इंटरकॉन्टिनेन्टल, हॉटेल मरीन प्लाझा, सी ग्रीन हॉटेल आणि इतर काही हॉटेल्स या भागात आहेत. तसेच तारापोरवाला मत्स्यालय, भेळेसाठी गिरगाव चौपाटी असे सर्व काही या मरीन ड्राइव्हवरच आहे. सुप्रसिद्ध गायिका सुरैया, राज कपूर, नर्गिस यांच्यासारखे कलाकार येथे पूर्वी राहत होते. 

तारापोरवाला मत्स्यालय

तारापोरवाला मत्स्यालय :
सर्व बाजूंनी सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे, अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक मिलार्ड यांनी मांडली. ही कल्पना तारापोरवाला या दानशूर कुटुंबाने दिलेले पैसे व जमिनीमुळे नऊ मे १९४७ रोजी २८ वर्षांनी मूर्त स्वरूपात आली. आबालवृद्धांचे आकर्षण असलेल्या तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत मरीन लाइन्सवर असून, तिची लांबी १०८ फूट व रुंदी ९४ फूट आहे. २७ मे १९५१ रोजी तारापोरवाला मत्स्यालय आणि तारापोरवाला सागरी जीव संशोधन केंद्र यांचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे हस्ते झाले. येथ सागरी आणि गोड्या पाण्यातील विविध जातींचे मासे पाहायला मिळतात. सागरी प्रकारातील हेलिकॉप्टर, अरोवना, ग्रूपर, निळा रंग असलेला स्टिंग्रे, तारा, जोकर, हार्क, ट्रिगर, ग्रूपर, पर्पल फायरफिश, कॉपरबँड बटरफ्लाय फिश, क्लाउन ट्रिगरफिश, ब्लू रिबन असे अनेक जातींचे मासे येथे आहेत. गोड्या पाण्यातील माशांमध्ये रेड डेव्हिल, जग्वार, इलेक्ट्रिक ब्लू जॅक डेम्प्सी, फ्रंटोसा, कॅटफिश यांसारख्या माशांचा समावेश आहे. १००हून अधिक प्रकारांचे मासे, जलजीव, नैसर्गिक खडक आदी प्रकार येथे पाहायला मिळतात. 



मत्स्यालयाची देखभाल मत्स्यव्यवसाय विभाग करतो. मत्स्यालयात  समुद्री पाण्याच्या १६ आणि गोड्या पाण्याच्या नऊ टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. ३२ उष्णकटिबंधीय टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. मत्स्यालयाच्या उष्णकटिबंधीय विभागात गर्भवती माशांसाठी मॉस अॅक्वेरियम, तसेच जलीय वनस्पतींची व्यवस्था केली आहे. बाहेरून आणलेले मासे टँकमध्ये टाकण्यापूर्वी त्यांना वातावरणात समरस होण्यासाठी, तसेच त्यांचे रोगनिदान, उपचार करण्यासाठी गोड्या व खाऱ्या पाण्याची स्वतंत्र युनिट्स तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक टँकमध्ये एलईडी व मेटलहॅलाइड ट्यूब लावून प्रकाशयोजना करण्यात आली आहे. 

मरीन ड्राइव्ह परिसर

वानखेडे स्टेडियम :
१९७४मध्ये हे स्टेडियम महाराष्ट्राचे तत्कालीन अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांच्या प्रयत्नांतून उभे राहिले. त्याची आठवण म्हणून त्यांचेच नाव या स्टेडियमला देण्यात आले. ३३ हजार ८०० प्रेक्षक बसू शकतील, असे हे स्टेडियम आधुनिक सोयींनी युक्त असे आहे. कॅन्टिलिव्हर छप्पर हे स्टेडियमचे मुख्य आकर्षण आहे. टेफ्लॉन फॅब्रिक छप्पर कमी वजनाचे आणि उष्णता प्रतिरोधक आहे. प्रेक्षकांना अधिक चांगले दिसावे यासाठी छतासाठी बीम वापरलेले नाहीत. छतावर एक्झॉस्ट फॅन बसविले आहेत जे स्टँडवरून गरम हवा बाहेर टाकतात. स्टेडियममध्ये उत्तर व दक्षिण स्टँडसाठी २० लिफ्ट आहेत. वानखेडे स्टेडियमच्या पुनर्विकासासाठी संयुक्तपणे प्रकल्प तयार करण्याकरिता मे. शशी प्रभू व असोसिएट्स आणि पी. के. दास असोसिएट्स यांची नेमणूक करण्यात आली होती. १९७४-७५नंतरच्या मोसमामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत असा पहिला सामना येथे खेळला गेला. पतौडीच्या नेतृत्वाखाली हा सामना भारत हरला होता. त्या वेळी क्लाइव्ह लॉइडने नाबाद २४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना येथे जिंकला. सचिन तेंडुलकर त्याचा शेवटचा सामना येथे खेळला. या मैदानाच्या अशा अनेक आठवणी आहेत. 



जिमखाने :
मरीन ड्राइव्हवर एकूण सात जिमखाने आहेत. ब्रिटिश सरकारने मुंबईतील सर्वधर्मीयांसाठी जिमखाने उपलब्ध करून दिले होते. 

कॅथोलिक जिमखाना : येथे जास्तकरून विवाह समारंभ होतात.

बॉम्बे ‘वायएमसीए’ जिमखाना : याची स्थापना दोन एप्रिल १८७५ रोजी ग्लासगोचे रेव्ह. ए. एन सॉमरविले यांनी केली. 
ग्रँट मेडिकल जिमखाना : हा जिमखाना खेळासाठी, तसेच समारंभासाठी वापरला जातो. 

विल्सन कॉलेज जिमखाना : येथे क्रिकेटसाठी कायमची राखलेली जागा आहे. हा भाड्याने मिळू शकतो. येथे मंडप, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे वगैरे सोयी आहेत. 

हिंदू जिमखाना : हे मैदान मुख्यतः फुटबॉल, क्रिकेट आणि इतर खेळांचे सामने आयोजित करण्यासाठी वापरले जाते. क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचे वडील येथे ग्राउंडमन होते. जिमखाना मैदानाचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी पाच मे १८९४ रोजी केले. 

इस्लाम जिमखाना : हा जिमखाना (सामाजिक आणि क्रीडा क्लब) मरीन ड्राइव्हला लागून आहे. १८९०मध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांनी जिमखान्यासाठी जागा दिली होती. १९४२पर्यंत जिमखाना हे बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय होते आणि ते संस्थापक सदस्य होते. हे महाराष्ट्र राज्य बिलियर्डस् असोसिएशनचे मुख्यालय आहे. जिमखाना सदस्यत्व सर्व समुदायाच्या लोकांसाठी खुले आहे. 



पारसी जिमखाना :
हा एक जिमखाना पारशी लोकांच्या क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांसाठी तयार केला होता. मुंबईमध्ये जातीय धर्तीवर बांधलेला हा पहिला जिमखाना होता. २०१०मध्ये पारसी जिमखान्याने अन्य समुदाय संघटनांसह क्रिकेटमधील समुदायात रस निर्माण करण्यासाठी एक प्रकल्प जाहीर केला.

लोकमान्य टिळक पुतळा

येथे नतमस्तक झालेच पाहिजे 

लोकमान्य टिळकांवर गिरगाव चौपाटीवर अंत्यसंस्कार झाले. त्यांचे येथे स्मारक आहे. विठ्ठलभाई पटेल यांचे स्मारकही याच परिसरात आहे. 

लोकमान्य टिळक पुतळा

शहीद तुकाराम ओंबळे स्मारकमुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबळे यांचे स्मारकही मरीन ड्राइव्ह भागात आहे. फोर्ट भागातून हल्ला करून पळून जाणाऱ्या अजमल कसाबला पकडण्याचा थरार गिरगाव चौपाटीला लागून असलेल्या सुभाषचंद्र रोडवरच झाला. ओंबळे यांनी त्याच्या गोळ्या छातीवर झेलल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कसाबला जिवंत पकडता आले. 

गिरगाव चौपाटी : वाळूत बसून भेळ खात सूर्यास्त पाहण्यासाठी, तसेच आपल्या लहानग्यांना मोकळेपणाने खेळता यावे म्हणून अनेक कुटुंबे येथे येतात. त्यामुळे या चौपाटीला कुटुंबवत्सल म्हणता येईल. ऊन उतरल्यावर समुद्राच्या लाटा पाहत बसणे हे खूप सुखावह असते. उत्तर भारतीय भैयांनी सजविलेले स्टॉल, तेथे मिळणारे भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, शेवपुरी, दहीपुरी, लस्सी, आइस्क्रीम असे नानाविध पदार्थ येथे आलेला माणूस चाखून पाहतोच. तहान भागविण्यासाठी शहाळ्याचे पाणीही असतेच. समुद्र उथळ असल्याने समुद्रात मनसोक्त खेळण्याची हौसही येथे भागविता येते. येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी वाळकेश्वर बाजूला नाना-नानी पार्कही आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी घरगुती, तसेच अनेक सार्वजनिक मंडळांच्या महाकाय गणपतींचे विसर्जन या चौपाटीवर केले जाते. लालबागच्या राजाचे विसर्जन हा तर एक सोहळाच असतो. 

गिरगाव चौपाटी

गिरगाव चौपाटी (१८६०)

कसे जाल मरीन ड्राइव्हकडे?
चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्नी रोड ही उपनगरीय रेल्वे स्टेशन्स या परिसरात आहेत. या स्टेशनवर उतरून मरीन ड्राइव्हवर जाता येते. तसेच बेस्टच्या बसेस आणि टॅक्सी हे पर्यायही आहेत. 

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(मुंबईतील पुरातन वारसा वास्तूंबद्दल माहिती देणारे, आर्किटेक्ट चंद्रशेखर बुरांडे यांनी लिहिलेले  लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZTICE
Similar Posts
मुंबई पर्यटन : राजभवन, वाळकेश्वर आणि परिसर... ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण मुंबईतील गिरगाव आणि मलबार हिल परिसरातील काही ठिकाणे पाहिली. आजच्या भागात मलबार हिलवरील वाळकेश्वर, राजभवन यांसह अन्य ठिकाणांची माहिती घेऊ या.
मुंबई पर्यटन : माहीम, सायन, धारावी ‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात मुंबईतील दादर, परळ वगैरे भागाची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या माहीम, सायन (शिव) आणि धारावी.
दक्षिण मुंबईतील विविध बाजार ‘करू या देशाटन’ सदराच्या आजच्या भागात आपण माहिती घेऊ या दक्षिण मुंबईतील विविध बाजारांची. त्यात मनीष मार्केटपासून बुक स्ट्रीटपर्यंत आणि चोरबाजारापासून जव्हेरी बाजारापर्यंतच्या विविध बाजारांचा आणि परिसरातील मंदिरांचा समावेश आहे.
मुंबई पर्यटन : धोबी तलाव परिसर ‘करू या देशाटन’ सदरात आपण सध्या मुंबईतील पर्यटनस्थळांची माहिती घेतो आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या धोबी तलाव परिसरातील ठिकाणांची...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language